बोन्साई -
काही प्रसंग आपल्याला
बरेच काही शिकवुन जातात. एका मित्राच्या
नविन बंगल्यात जाण्याचा योग आला. आधुनिक
जगातील सर्व संकल्पना एकाच ठिकाणी समाविष्ट करुन हा बंगला बांधला आहे आणी त्याच्या
डिझाईन साठी खास परदेशी इंजिनिअरची मदत घेतल्याचे मित्र मला सांगत होता. भारतात न
रहाता आपण परदेशातच रहात आहोत आसे घरात वाटावे याची पुरेपुर काळजी घेतली
होती. घरातील खिडक्या उघड्या आसल्या की घरातील “प्रायवसी
डिस्टब” होते म्हणुन प्रत्येक खोलीमध्ये एसी होता.
सहजच माझे लक्ष बोन्साई
झाडा कडे गेले . एका वडाच्या बोन्साई केलेले खुरटे झाड एका कोप-यात शोभेसाठी ठेवले
होते. मी त्या कडे पहातो आहे हे पाहिल्यावर माझ्या मित्रांने अति उत्साहाने या बोन्साई
प्रकाराविषयी माहिती देणे सुरु केले. हे वडाचे झाड १५ वर्षाचे होते. माझे उत्सुकता प्रमाणा बाहेर वाढली. हा प्रकार
जवळुन पहाण्याची माझी पहिलीच वेळ होती.
मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला हे १ वर्षाचे झाड विकत घेतल्याचे त्यांने सांगितले.
मुलाच्या रुमच्या बाहेरचा कोपरा खास या झाडासाठीच राखुन ठेवला होता. तेव्हा मला
माझ्या मित्राला एक १५ वर्षाचा मुलगा आसल्याचे समजले. मला त्याला भेटण्याची इच्छा
झाली . तडक त्या मुलाच्या रुम मध्ये गेलो मुलगा त्याच्या नादात मोबाईल वर गेम खेळत
होता. मी त्याला त्याचे नाव विचारले तर त्याने फ़क्त माझ्या कडे एकदा पाहिले आणी
पुन्हा गेम मध्ये मग्न झाला. १५ वर्षाचा एक मुलगा दिवस दिवस त्याच्या रुमच्या
बाहेर येत नाही. कोणी त्याच्याशी बोलले तर बोलत नाही. १० बाय १५ ची एक रुम हेच
त्याचे विश्व ! सेल्फ़कंटेड !!!
का कोणास ठावुन मला त्या
मुलाची आणी त्या बोन्साई केलेले खुरट्या झाडाची तुलना करावी आसे वाटु लागले. जे मी
लहानपणी अनुभवले दिवस आता डोळ्यापुढे दिसु लागले. शाळेसमोरील विशाल वडाचे झाड , त्याला
आसणा-या पारंब्या ! त्या वर झोके घेणारी असंख्य मुले ... दिवस दिवस त्या सावली खेळणारी बागडणारी मुले !
झाडावर बसलेले पक्षी ... खरच आधुनिक काळात
आपण सर्वच जण एक बोन्साई झालो आहोत का ? आपण आपली नैसर्गिक वाढ कोठेतरी रोखुन धरली
आहे का ? वडाला वटवृक्ष म्हणतात तो तसाच आसला पाहिजे. तो कधीच खुरटा रहाता कामा
नये . त्याच्या पारंब्यातुन पुन्हा दुसरा वड तयार झाला पाहिजे ... ही सतत घडणारी
घटना असली पाहिजे. माणसां माणसांपासुन माणुसकीचा झरा निरंतर वाहिला पाहिजे. आपण
कधीच आपला बोन्साई होवु देता कामा नये.